मरणोत्तर मुक्तीच्या
माझ्या घरापर्यंत चालत आलेल्या
ऑफर्स मी लावतोय धुडकावून.

जगण्याची बंधनं समजून घेतानाच्या
होणार्‍या दमछाकीला
आता कुठे उकलताहेत
माझ्या श्वासांच्या गाठी.

स्वातंत्र्याच्या गर्भातली ऊब
मी नव्याने अनुभवतोय
पूर्वीपेक्षा जास्ती प्रेमाने.

प्रिय वास्तवा,
माझ्या शापित कवितेला
लाभू दे नितांत सुंदर उ:शाप
अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा.

हल्ली,
शब्दांच्या पिंडाला
शिवता शिवत नाहीत
अर्थाचे कावळे

आणि
भाषेच्या श्राद्धवजा पुण्यस्मरणाची
तयारी करून
कवितेचा मुक्तीसाठीचा धिंगाणा
विखुरतोय जगण्याच्या स्मशानभर!

जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…
अगदी जमल्यासच (आणि लक्षात राहिलंच तर)
फक्त तुझ्या श्वासांची
एक पाकळी पाठवून दे माझ्याकडे
असं म्हणालो होतो माझ्याही नकळत.

माझं हे ‘नकळत’पणच
तू इतकं मनावर घेतलंस की,
समर्पणाची देठं लावलेल्या
लक्षावधी फुलांची  वादळं
घेऊन आलीस माझ्या देहाच्या देशात!
जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…

ठरलंच होतं तुझं माझं…
आपल्या दोघांच्या दोन विभिन्न
शहराच्या मध्ये जी (मन)मोकळी
अफाट जागा दिसते,
जो प्रदेश दिसतो
क्षितीजापार भिडलेला…
जे स्वच्छंदी रान दिसतं
वार्‍याच्या स्पर्शाने अक्षरश: विनाकारण हसणारं,
नसलेल्या ओठांतून जिथे चुंबनाचे पक्षी
उडतात आणि
शब्दांचे दाणे टिपून
नसलेल्या घरट्यात परततात…
तश्या त्या तिथे
अगदी तुझ्या माझ्या मधोमध
एक शहर वसवायचं…

ठरलंच होतं तुझं माझं
अलिखीत करारानुसार.
तसा ‘आराखडा’ वगैरे तयार
करणं काहीच अवघड नव्हतं…
‘ तू तिकडून जसं हवं तसं बांधत ये,
 मी इकडून बांधत येईन
 आयुष्याचे जन्मदत्त सात-बारा उतारे
 अभ्यासून.
 कुठे मध्य नाही ,कुठे अंत नाही.
 फक्त प्रारंभ केल्याच्या मजकूरवजा इशारा
 असणार्‍या चिठ्ठ्या
 पाठवायच्या वरील पक्ष्यांमार्फत.
 बांधता बांधता  अनाहूतपणे
 तुझ्या माझ्या काही इमारती  आरपार भिडल्या
 तरी मंजूर अतिक्रमण.
 
 कुणाचीच चूक नाही,
 कुणीच बरोबर नाही,
 ह्या तत्वाच्या ठिसूळ पायावर बांधत राहणे नितांत.
 आणि शेवटच्या विटेवर
 ’माणूस’ उभा करायचा
 जागच्या जागी अनादीकार.
 ’
ठरलंच होतं तुझं माझं…
तसं ठरल्याप्रमाणे बांधूनही झालं,
त्यागाकारापासून भोगाकारापर्यंत
विविध आकारांच्या वास्तूंची उडाली
मन:पूर्वक धांदल ह्या नव्या शहरात.

राहता राहिला प्रश्न माणसाचा…
आणि नव्या मेट्रोस्टाईलने आपण एकमेकांना
हाका मारीत राहिलो,
पण विटांमध्ये चिणलेल्या कुठल्याच दिशेने
‘ओ’ आली नाही माणसांसारखी.
शेवटी रात्र होण्याआधीच आपण
इच्छांचा गाशा गुंडाळून इथून रिटर्न
आपापल्या ओरीजनल शहरात
माणसाच्या चिरंतन शोधात.
हे देखील ठरलंच होतं तुझं माझं…

आता निर्मनुष्य नव्या शहराच्या गर्भातून
जन्म घेताहेत अंतर्यामी चकवे,
पूर्वीच्या स्वच्छंदी रानाच्या थडग्यावर
शांत बसून असतात वरील पक्षी
आपल्या दोघांसकट माणसाच्या ‘माणूस’पणाची वाट पाहत!!

ठरलंच होतं तुझं माझं…

आजचा दिवस मजेत गेला
उद्याचा दिवस सजेत जाईल…
जगण्याच्या काही खाणाखुणा
घेऊन हा श्वास हवेत जाईल.

कसल्या कसल्या बंधनात अडकत चाललोय मी?
स्वतंत्र झेंड्यासारखा म्हणे फडकत चाललोय मी!
रोज रोज,
तेच तेच,
तसंच तसंच,
पुन्हा पुन्हा…
पैसा,
नोकरी,
घर,
दार,
नाती,
माती…
रूटीनच्या ठसक्याने
पिचलेली खचलेली
छाती.

मला जगण्यात बदल हवाय…

हे सगळं माझ्या हातात असून माझे पाय बांधलेले!

मला जगण्यात बदल हवाय…

थेंब थेंब साठता साठता… हातून पेले सांडलेले!

शब्दांशिवाय माझ्या सोबत दुसरं कोणीच नाही,
डोळ्यांमध्ये सर्व काही… फक्त पाणीच नाही…!!!

नेहमीप्रमाणेच आलास…
काळोखाची ओंजळ घेऊन
डोळ्यांच्या उध्वस्त दारांसमोर…
नेहमीप्रमाणेच उभा राहिलास

संन्याश्याच्या मौनार्त भाषेत
मागितलेस दान
रातराणीच्या तुडूंब गंधसागराला
दुर्लक्षाचे हजार किनारे लावून (हे देखील नेहमीप्रमाणे!)

मागितलेस दान कशाचे
हे कळलेच नाही मला नेहमीप्रमाणे…
आयुष्यभराचा वणवा रक्ताने विझवून
जे गवसले दोन काजवे फक्त…
तेच तुझ्या ओंजळीत ओतले (सवयीनुसार)

…तेवढ्याश्या सूर्यांश झरोक्यांतही
आपण पाहून घेतल्या एकमेकांच्या हाताला
झालेल्या जखमा… केलेल्या खुणा…
(जिज्ञासेच्या सातव्या मजल्यावर चोरपावलांनी
पोहोचू पाहणारी निर्विकार जाणिव…)

जाताना वळून मागे पाहिले नाहीस.
निद्रेचा पाचोळा तुडविण्यार्‍या आवाजातून
तुझी पावलं सांगतच राहिली मला,

” हे जे दोन काजवे आहेत ना,
त्यातल्या एकाचा चंद्र बनवायचा प्रयत्न करीन!
आश्वासन देत नाही,
पण प्रयत्न करायला काय हरकत??

मात्र,
त्यांतल्याच एका काजव्याचा
उद्या सूर्य होणार हे निश्चित…
अगदी काळोखाची शप्पथ हं!!
फक्त आजची रात्र हुंदक्यांची गस्त
घालण्या-या वेदनांसोबत
सावधपणे पार पडो ही सदिच्छा.

उद्याची भूपाळी तुलाच गायची आहे
कदाचित नेहमीप्रमाणे! “

इतकं घडूनही काहीच न घडल्यासारखं
तुझं विरघळून जाणं पूर्वेच्या काळोखात!

 main.jpeg

 ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात
माझ्यातल्या चौथ्या डायमेन्शनपर्यंत
पेटलेला तुझा अमलताशी स्पर्श…
किती छळशील अजुन…??

अद्याप माझ्या हद्दीत आला नाहीये
आयुष्याच्या नाक्यावर
तुफान कोसळणारा पावसाळा
आणि
तुझ्या स्पर्शासक्त आठवणींचं
अक्षरश: लगेज कॅरी करण्यासाठी
स्वत:चीच सावली 
जकात म्हणून द्यावी लागणारंय मला.
किती छळशील अजुन…??

माझ्या धमन्यांच्या उष्माघातकी रस्त्यावरून
उर फुटेस्तोवर धावतेय
एक सावली तुझ्यातुझ्यापर्यंत…
मी ऋतूंच्या स्टेजवर उभा असलेला
कदाचित शेवटचा शोकांतसम्राट.
किती छळशील अजुन…??
ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात…

Next Page »