जाता जाता जखमेवर
चार थेंब काय सांडून गेलीस
तुला वाटलं मी ठणठणीत बरा झालो!!
जा पोरी जा…खुशाल जा…
आता तुझ्या भल्यासाठी
मी मनापासून प्रार्थना करतो–
पुन्हा माझ्या स्पर्शाच्या काजव्यांनी
कधीही न जळो तुझ्या काळजाचा पदर
आणि
माझ्या अंधाराच्या डोळ्यांतून
तुफानलेल्या दुःखोत्सवाला रोखताना
अपुरीच पडो
तुझ्या सत्तावीस नक्षत्रांची वांझोटी सहानभूती!