ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात
माझ्यातल्या चौथ्या डायमेन्शनपर्यंत
पेटलेला तुझा अमलताशी स्पर्श…
किती छळशील अजुन…??
अद्याप माझ्या हद्दीत आला नाहीये
आयुष्याच्या नाक्यावर
तुफान कोसळणारा पावसाळा
आणि
तुझ्या स्पर्शासक्त आठवणींचं
अक्षरश: लगेज कॅरी करण्यासाठी
स्वत:चीच सावली
जकात म्हणून द्यावी लागणारंय मला.
किती छळशील अजुन…??
माझ्या धमन्यांच्या उष्माघातकी रस्त्यावरून
उर फुटेस्तोवर धावतेय
एक सावली तुझ्यातुझ्यापर्यंत…
मी ऋतूंच्या स्टेजवर उभा असलेला
कदाचित शेवटचा शोकांतसम्राट.
किती छळशील अजुन…??
ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात…

May 18, 2007 at 9:44 am
sahii!