नेहमीप्रमाणेच आलास…
काळोखाची ओंजळ घेऊन
डोळ्यांच्या उध्वस्त दारांसमोर…
नेहमीप्रमाणेच उभा राहिलास

संन्याश्याच्या मौनार्त भाषेत
मागितलेस दान
रातराणीच्या तुडूंब गंधसागराला
दुर्लक्षाचे हजार किनारे लावून (हे देखील नेहमीप्रमाणे!)

मागितलेस दान कशाचे
हे कळलेच नाही मला नेहमीप्रमाणे…
आयुष्यभराचा वणवा रक्ताने विझवून
जे गवसले दोन काजवे फक्त…
तेच तुझ्या ओंजळीत ओतले (सवयीनुसार)

…तेवढ्याश्या सूर्यांश झरोक्यांतही
आपण पाहून घेतल्या एकमेकांच्या हाताला
झालेल्या जखमा… केलेल्या खुणा…
(जिज्ञासेच्या सातव्या मजल्यावर चोरपावलांनी
पोहोचू पाहणारी निर्विकार जाणिव…)

जाताना वळून मागे पाहिले नाहीस.
निद्रेचा पाचोळा तुडविण्यार्‍या आवाजातून
तुझी पावलं सांगतच राहिली मला,

” हे जे दोन काजवे आहेत ना,
त्यातल्या एकाचा चंद्र बनवायचा प्रयत्न करीन!
आश्वासन देत नाही,
पण प्रयत्न करायला काय हरकत??

मात्र,
त्यांतल्याच एका काजव्याचा
उद्या सूर्य होणार हे निश्चित…
अगदी काळोखाची शप्पथ हं!!
फक्त आजची रात्र हुंदक्यांची गस्त
घालण्या-या वेदनांसोबत
सावधपणे पार पडो ही सदिच्छा.

उद्याची भूपाळी तुलाच गायची आहे
कदाचित नेहमीप्रमाणे! “

इतकं घडूनही काहीच न घडल्यासारखं
तुझं विरघळून जाणं पूर्वेच्या काळोखात!