ठरलंच होतं तुझं माझं…
आपल्या दोघांच्या दोन विभिन्न
शहराच्या मध्ये जी (मन)मोकळी
अफाट जागा दिसते,
जो प्रदेश दिसतो
क्षितीजापार भिडलेला…
जे स्वच्छंदी रान दिसतं
वार्याच्या स्पर्शाने अक्षरश: विनाकारण हसणारं,
नसलेल्या ओठांतून जिथे चुंबनाचे पक्षी
उडतात आणि
शब्दांचे दाणे टिपून
नसलेल्या घरट्यात परततात…
तश्या त्या तिथे
अगदी तुझ्या माझ्या मधोमध
एक शहर वसवायचं…
ठरलंच होतं तुझं माझं
अलिखीत करारानुसार.
तसा ‘आराखडा’ वगैरे तयार
करणं काहीच अवघड नव्हतं…
‘ तू तिकडून जसं हवं तसं बांधत ये,
मी इकडून बांधत येईन
आयुष्याचे जन्मदत्त सात-बारा उतारे
अभ्यासून.
कुठे मध्य नाही ,कुठे अंत नाही.
फक्त प्रारंभ केल्याच्या मजकूरवजा इशारा
असणार्या चिठ्ठ्या
पाठवायच्या वरील पक्ष्यांमार्फत.
बांधता बांधता अनाहूतपणे
तुझ्या माझ्या काही इमारती आरपार भिडल्या
तरी मंजूर अतिक्रमण.
कुणाचीच चूक नाही,
कुणीच बरोबर नाही,
ह्या तत्वाच्या ठिसूळ पायावर बांधत राहणे नितांत.
आणि शेवटच्या विटेवर
’माणूस’ उभा करायचा
जागच्या जागी अनादीकार.
’
ठरलंच होतं तुझं माझं…
तसं ठरल्याप्रमाणे बांधूनही झालं,
त्यागाकारापासून भोगाकारापर्यंत
विविध आकारांच्या वास्तूंची उडाली
मन:पूर्वक धांदल ह्या नव्या शहरात.
राहता राहिला प्रश्न माणसाचा…
आणि नव्या मेट्रोस्टाईलने आपण एकमेकांना
हाका मारीत राहिलो,
पण विटांमध्ये चिणलेल्या कुठल्याच दिशेने
‘ओ’ आली नाही माणसांसारखी.
शेवटी रात्र होण्याआधीच आपण
इच्छांचा गाशा गुंडाळून इथून रिटर्न
आपापल्या ओरीजनल शहरात
माणसाच्या चिरंतन शोधात.
हे देखील ठरलंच होतं तुझं माझं…
आता निर्मनुष्य नव्या शहराच्या गर्भातून
जन्म घेताहेत अंतर्यामी चकवे,
पूर्वीच्या स्वच्छंदी रानाच्या थडग्यावर
शांत बसून असतात वरील पक्षी
आपल्या दोघांसकट माणसाच्या ‘माणूस’पणाची वाट पाहत!!
ठरलंच होतं तुझं माझं…
May 18, 2007 at 12:17 pm
वा…
मंजुर अतिक्रमण
क्या बात है